Tuesday, September 15, 2020

बुद्धीची ताकद


एकदा सुकरात आपल्या शिष्यांसोबत कोणत्या तरी विषयावर बोलत बसले होते. तेवढ्यात तिथे एक ज्योतिष आला आणि म्हणाला,"मी ज्ञानी आहे. मी कुणाचाही चेहरा पाहून त्याचे चरित्र काय आहे, हे सांगू शकतो. सांगा,तुमच्यापैकी कोण माझी ही विद्या पारखू इच्छितो."

सुकरातनी त्याला आपल्याविषयी सांगायला सांगितले. ज्योतिषाने  काही वेळ त्यांना निरखून पाहिलं आणि म्हणाला,"तुमच्या चेहऱ्याची ठेवण सांगते की, तू सत्तेविरुद्ध आहेस.तुझ्या अंगी द्रोह करण्याची भावना प्रबळ आहे. तुझ्या डोळ्यांभोवती ज्या सुरकुत्या आहेत. त्या तू अत्यंत रागीट असल्याचे प्रमाण देतात." 

हे सर्व ऐकून शिष्यगण संतापले. पण सुकरातनी त्यांना गप्प बसवले. ज्योतिष पुढे म्हणाला,"तुझे बेढब डोके आणि कपाळावरून तू खूप लोभी आहेस, हे कळते."

सुकरातनी त्याला बक्षीस दिलं आणि निरोप दिला. शिष्य मंडळी आश्चर्यात पडले. गुरूंचे वागणे त्यांच्या पचनी पडेना. 

सुकरात त्यांना समजावत म्हणाले,"ज्योतिषाने सांगितलेले सगळे अवगुण माझ्यात आहेत. पण त्याला माझ्यातल्या विवेक ओळखता आला नाही. या विवेकामुळेच मी माझ्यातल्या अवगुणांवर विजय मिळवला आहे. तो इथेच चुकला, माझ्या बुद्धीची ताकद त्याला ओळखता आली नाही."

तात्पर्य:बुद्धीचा वापर करून आपण आपल्या अवगुणांवर विजय मिळवू शकतो.

Wednesday, September 2, 2020

राजा आणि चोर


भगवान महावीरसोबत एक लहान मुलगा बसलेला  असताना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने भगवान महावीरांना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?"

महावीर म्हणाले "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच महावीरांना म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला", महावीर म्हणाले "तो राजा आहे." मुलगा महावीरांना म्हणाला " या दोघात काय फरक आहे ? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई होते."

महावीर म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वातंत्र नाही, शिपाई जिकडे नेतील तिकडे जायचं, शिपाई जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. कारण तो बंदिस्त आहे.....परंतु राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे ते राजा बरोबर जातील, राजा जे काही सांगणार ते सर्व ते करणार, जर राजा बोलला कि तुम्ही जा, मला एकटे राहू देत, तर निघूनही जातील, कारण राजा मुक्त आहे."

तात्पर्य-"आपले मन, आपल्या भावना म्हणजे द्वेष, तिरस्कार, राग, लोभ, मत्सर, अहंकार, असूया, कपट, गर्व हे सर्व विकार आपले शिपाई आहेत, आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत.   निवड तुमची आहे."

Tuesday, September 1, 2020

मित्रांविषयी


एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगू का?'

'एक मिनिट थांबा' चाणक्याने उत्तर दिले.

'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल?"

ती व्यक्ती म्हणाली, "तिहेरी फिल्टर? ठीक आहे."

चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी. तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे. म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो."

"आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का?'

थोडसं थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही.' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले."

"आणि...'

"ठीक आहे.' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खरं आहे. याची खात्री नाही तुम्हाला?...

आता दुसरा फिल्टर! आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काही तरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?'

ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट...' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,'तू मला त्याच्याबद्दल काही तरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही. ठीक आहे! आता उपयुक्तता फिल्टर! हा शेवटचा फिल्टर..... ! जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे"

"काय?'

'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही." ती व्यक्ती ओशाळत म्हणाली.

"ठीक आहे.' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता,

ते ना सत्य आहे. ना चांगले आहे. ना मला उपयोगी आहे. तर मला ते का सांगता आहात?'

तात्पर्य- प्रत्येक  वेळी आपल्या जवळच्या प्रियजनांबद्दल, मित्रांबद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. हे तिहेरी फिल्टरच खरोखर खूप उपयुक्त आहे. तुमचे नाते टिकवण्यासाठी!!!

Thursday, August 20, 2020

न्याय

जपानमध्ये एका न्यायालयात एका म्हाताऱ्या माणसावर ब्रेड चोरल्याप्रकरणी खटला सुरु होता. त्याने न्यायाधीशांसमोर गुन्हा कबुल केला. तो काही दिवसांपासून उपाशी होता आणि ब्रेड पाहिल्यावर न राहवल्याने त्याने चोरी केली. 'ब्रेड चोरला नसता तर मरण पावलो असतो'. असेही त्याने सांगीतले.

न्यायाधीश म्हणाले "तुम्ही गुन्हा कबुल केल्यामुळे दहा डाॅलर ईतकी दंडाची शिक्षा देतो. पण तुमच्याकडे दंड भरण्याइतके पैसे नाहीत याची मला कल्पना आहे. ते असते तर तुम्ही चोरी केली नसती म्हणुनच मी हा दंड भरतो." न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीश उभे राहीले आणि उपस्थीतांना म्हणाले, "सर्व उपस्थीतांना दहा दहा डाॅलर ची शिक्षा फर्मावतो कारण तुम्ही अशा देशात राहता, जिथे एका गरीब माणसाला पोट भरण्यासाठी ब्रेडची चोरी करणे भाग पडते. ही बाब  कोणत्याही देशासाठी लज्जास्पद आहे." न्यायाधिशांचे बोलणे ऐकून सगळे स्तब्ध  झाले. त्या प्रत्येकाने दहा दहा डाॅलरची रक्कम जमा केली. त्यातून 500 डाॅलर जमा झाले. न्यायाधीशांनी ती रक्कम वृध्दाला दिली आणि छोटा व्यवसाय सुरु करा असे सांगीतले. जेणेकरुन तुम्हाला ब्रेडसाठी पुन्हा चोरी करावी लागणार नाही.

तात्पर्य: माणसाकडे माणूस म्हणून पाहील्याने न्याय होतो. शेवटी "माणूसकी म्हणजे तरी काय माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे "

Tuesday, June 9, 2020

नवं घर घेण्याची आस

एका गावात एक माणूस राहत होता. त्याचं घर खूप सुंदर होतं आणि चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं होतं. आजूबाजूला मस्त हिरवळ होती. जवळूनच खळखळ नदी वाहत होती. त्याच्या घराजवळ खूप शांतता होती. या परिसरात पशु-पक्ष्यांचा मोठा वावर होता. हा माणूस अनेक वर्षांपासून या घरात राहत होता. पण अलीकडे त्याला इथे काही चांगलं वाटत नव्हतं. त्याला आपल्या घरात राहायला आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने हे घर विकून दुसरं नवीन घर घेण्याचा विचार केला. त्याचा एक मित्र वर्तमानपत्रात कामाला होता. त्याला एकदा भेटून आपली इच्छा प्रकट केली. नवीन घरं असली तर सांगण्यास सांगितले.
काही दिवस निघून गेले. एक दिवस त्याच्या मित्राने पाच-सात घरे बघायला सांगितली. ती त्याने पाहिलीही, पण त्याला त्यातले एकही घर पसंद पडले नाही.

Monday, June 8, 2020

सहनशीलता

युनानचे महान तत्त्वज्ञ होते सुकरात. त्यांची बायको खूपच  भांडकूदळ होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती सुकरात यांच्याशी भांडत असे. पण प्रत्येक वेळी सुकरात शांत राहायचे. एके दिवशी सुकरात आपल्या काही शिष्यांसह घरी आले. कुठल्या तरी कारणाने त्यांची पत्नी त्यांच्यावर नाराज झाली. सुकरातनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे रागाने ती सुकरात यांना वाईट वंगाळ बोलू लागली. एवढं सगळं होऊनही सुकरात काहीच बोलले नाहीत. त्यामुळे आणखी चिढलेल्या पत्नीने बाहेरून चिखल आणून त्यांच्या अंगावर टाकला. तेव्हा सुकरात मोठमोठ्याने हसू लागले आणि म्हणाले,"तू  एक जुनी म्हण खोटी ठरवलीस.'गर्जेल तो बरसेल कसा" या म्हणीचा अर्थ जो गरजतो तो बरसत नाही. पण तू मात्र गर्जतेसही आणि पडतेही."

Monday, May 25, 2020

नुकसान

एकदा गांधीजींना कशासाठी तरी लिंबाची पाने हवी होती. त्यांनी आश्रमातल्या एक तरुणाला सांगितले की, जा आणि लिंबाची दोन पानं तोडून आण. तो तरुण गेला आणि आश्रमाशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाची एक फांदीच तोडली. त्याने ती फांदी गांधीजींच्या समोर आणून ठेवली. गांधीजींनी ती फांदी पाहिली, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. गांधीजी म्हणाले,"आता या लिंबाचा वापर मी करू शकत नाही."

जमीन फाटली,पळा पळा

एका गावात एक माणूस झाडाखाली आराम करण्यासाठी आडवा झाला. वर झाडाकडे पाहात तो विचार करू लागला की, जमीन फाटली तर त्याचे काय होईल? तेवढ्यात जोरदार धमाक्याचा आवाज झाला. तो घाबरून ओरडू लागला, जमीन फाटली,पळा पळा. असे ओरडतच तो एका दिशेने पळू लागला. त्याला असे पळताना पाहून एकाने त्याला विचारले,'काय झाले?' तर  तो धावत धावतच सांगू लागला,' जमीन फाटली आहे, जीव वाचव आणि तूही पळ.'

Sunday, May 24, 2020

मजुराच्या चपला

एकदा एक श्रीमंत माणूस आपल्या मुलासोबत पाय मोकळे करण्यासाठी फिरत निघाला होता. तेवढ्यात त्यांना वाटेत एक जोड जुनी चप्पल दिसली. ती जवळच्या शेतात काम करणाऱ्या कुणा  एका मजुराच्या होत्या. मजूर काम संपवून घरी परतण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात मुलगा श्रीमंत बापाला म्हणाला,"बाबा, या चपला आपण लपवूयात. मजूर चपला शोधेल, तेव्हा  खूप मजा येईल. तो श्रीमंत माणूस गंभीर होऊन म्हणाला,"कुणाची अशी चेष्टा करणे योग्य नाही. यापेक्षा आपण या चपलांमध्ये काही नाणी लपवून ठेवूयात. आणि मग त्या मजुरावर त्याचा काय परिणाम होतो ते पाहूया.

कोळीणचं जाळं

एका घरात एक कोळीण आपलं जाळं विणण्यासाठी जागा शोधत होती. खूप शोधाशोध केल्यावर तिने खोलीच्या एका कोपऱ्यातील जागा निवडली आणि तिथे जाळं विणायला सुरुवात केली. काही वेळानं तिनं पाहिलं की, एक मांजरीण तिच्याकडे पाहून हसत आहे. कोळीणनं विचारलं तेव्हा,मांजरीण म्हणाली की, ही जागा तर स्वच्छ, साफसफाई केलेली आहे. इथे ना माशा आहेत, ना डास. मग इथे तुझ्या जाळ्यात अडकेल कोण?'

तीन लाखाचा डाव

एकदा एका गावात कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानाला तीन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी खूप लांबून लांबून पैलवान आले आणि त्यांनी आपली ताकद दाखवली. त्या सगळ्या पैलवानांमध्ये एक असा पैलवान होता, ज्याला कुणीच हरवू शकले नाही. जेव्हा त्याने सगळ्या पैलवानांचा पराभव केला ,तेव्हा त्याने उपस्थित सर्व ग्रामस्थाना आव्हान दिले की, इथे असा कुणी 'माय का लाल' आहे का, जो माझ्यापुढे उभे राहण्याची हिम्मत करेल.'

पानाची ताकद

एका बागेत गुलाबाचे एक रोप होते. बागेत आलेला प्रत्येकजण गुलाबाच्या फुलांची प्रशंसा करत असे. अशात रोपामधल्या एका पानामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की, आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं तो उदास राहू लागला. एक दिवस खूप मोठं वादळ आलं आणि गुलाबाची सगळी फुलं तुटून पडली. ते उदास पानदेखील तुटून उडत उडत एका तलावात जाऊन पडलं. त्या तलावात एक मुंगी बुडत होती आणि जीव वाचवण्यासाठी धडपडत होती.

गरुड भरारी

एकदा एका राजाला गरुडाची दोन पिलं भेट स्वरूपात मिळाली. राजाने त्यांचा सांभाळ करण्यासाठी एका गड्याची नियुक्ती केली. काही दिवसांनी राजा ती दोन पिलं पाहायला गेला. ती दोन्ही पिलं आता मोठी झाली होती. त्यांचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केलेल्या माणसाला राजानं सांगितलं, की त्याला गरुडांना उडताना मला पाहायचं आहे. माणसाने गरुडांना आकाशाच्या  दिशेनं उडवलं.

Saturday, May 23, 2020

राजाचे मित्र

राजा आदर्शसेनच्या राज्यात प्रजा खूप आनंदी आणि समाधानी होती. तिथे कधी कसला ताणतणाव नव्हता. ही गोष्ट शेजारच्या राज्याचा राजा कुशलसेनपर्यंत पोहचली. त्याच्या राज्यात नेहमीच भांडणतंटे होत होते आणि प्रजा दुखी होती. राजा कुशलसेन आपल्या शेजारी राज्यातील सुख-शांती आणि आनंद याचे रहस्य जाणून घेण्यासाठी आदर्शसेनकडे पोहचला आणि म्हणाला," माझ्या राज्यात तर सगळीकडे दुःख आणि आजार पसरला आहे. संपूर्ण राज्यात बेबंदशाही माजली आहे. कृपया, मला तुमच्या राज्यातील सुख-शांतीचे रहस्य सांगा. "

Friday, May 22, 2020

वाईटामुळे नुकसान

दोघे शेजारी होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. एक दिवस दोघांत कुठल्यातरी कारणावरून वाद झाले. दोघांची बोलचाल बंद झाली. पहिला शेजारी तसा विनम्र होता, पण दुसरा शेजारी मात्र त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता. त्याने या शेजाऱ्याविषयी लोकांना वाईट -साईट सांगू लागला. एक दिवस त्याला त्याच्या या वागण्यावर पश्चाताप झाला. तो एका साधूजवळ गेला आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला,'ती व्यक्ती वाईट नाही,पण मीच त्याच्याविषयी लोकांमध्ये वाईट-वंगाळ सांगितले आहे. आता पहिल्यासारखं चांगलं होईल का? मी काय करू?'

समर्पित कर्मचारी

एक तरुण होता.एक मोठी कंपनी त्याला आवडायची. या कंपनीत कसल्याही परिस्थितीत नोकरी मिळावी, हेच त्याचं ध्येय होतं. कंपनीची जागा सुटली. त्याच्या डिग्रीशी अनुरूप पदाला त्याने अर्ज केला. मुलाखतीच्या वेळेला मात्र त्याला त्याचं ट्रेनिंग योग्य झालं नसल्याचं सांगण्यात आलं. पण त्याला हेही सांगण्यात आलं की, या पदापेक्षा खालची जागा आहे, तिथे तू काम करतोस का बघ. त्याच्या शिक्षणाच्या तुलनेत ती जागा फारच कमी दर्जाची होती. तरीही  त्याने लगेच होकार दिला.

मनासारखं काम

एकाच घरातील दोन मुलं नोकरी-व्यवसाय करण्याच्या वयाची झाली. तेव्हा दोघांनाही त्यांच्या मनासारखा कामधंदा करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यातल्या लहानग्या मुलाने असा व्यवसाय निवडला, ज्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. इकडे मोठ्या मुलाने मात्र आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मित्रांचे पाहून मोठा व्यवसाय निवडला. काही काळ गेला. दुसऱ्यांचे पाहून काम सुरू करणारा मोठा मुलगा आता तणावात राहू लागला.

Thursday, May 21, 2020

कोण आहे श्रेष्ठ?

एका संताकडे दोन विद्वान आले आणि स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगू लागले. त्यांनी संताला विनंती केली की, दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे,हे तुम्हीच सांगावे. संताने दोघांची परीक्षा घेतली,पण दोघे 'एकापेक्षा एक' निघाले. त्यांनाही कळेना,कुणाला श्रेष्ठ सांगावे. काहीतरी विचार करून संत म्हणाले, "आतापर्यंत दोघेही समान समान विद्वान आहात, असेच दिसते. परंतु तुम्हां दोघांपैकी कुणा एकाला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवता आले पाहिजे. त्यासाठी तुमची आणखी एक परीक्षा घेतली जाईल. यात जो उत्तीर्ण होईल, तो श्रेष्ठ असेल.'

विजयाचे रहस्य

एका दहा वर्षांच्या मुलाने त्याचा डावा हात एका कार दुर्घटनेत गमावला असतानाही जुडोचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जुडो गुरूने त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तीन महिन्यांपर्यंत त्याचे गुरू त्याला एकच डाव शिकवत राहिले. जेव्हा याबाबतीत त्याने गुरूला विचारले,तेव्हा ते म्हणाले की, तुझ्यासाठी हा एकच डाव पुष्कळ आहे. मुलाने गुरूवर विश्वास ठेवला आणि शिकत राहिला. काही दिवस उलटल्यानंतर  गुरूने त्याला एका जुडो स्पर्धेत घेऊन गेले.

Wednesday, May 20, 2020

कष्टाची किंमत

एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याला एक मुलगा होता, राहुल. राहुलला वायफट खर्च करण्याची सवय लागली होती. त्याच्या वडिलांनी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. एक दिवस वडिलांनी त्याला सांगितले की, त्याने रोज 100 रुपये त्यांना आणून द्यायचे. राहुल तयार झाला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याला 100 रुपये मागितले. ऐकून राहुल चकित झाला,कारण वडील त्याच्याशी मस्करी करीत आहेत, असे त्याला वाटले होते. असो, शेवटी तो त्याच्या आजीकडे गेला, आणि तिच्याकडून 100 रुपये घेऊन वडिलांना दिले. वडिलांनी ती नोट फाडली. राहुलने विचारलं, 'तुम्ही असं का केलं'

इंजिन आणि हृदय

एक शहर होतं आणि या शहराच्या मुख्य बाजारात एक मोठं गॅरेज होतं. त्या गॅरेजचा मालक म्हटलं तर तसा भला माणूस होता,पण त्याच्यात एक कमतरता होती. तो आपल्या कामाला मोठं आणि दुसऱ्याच्या कामाला छोटं समजायचा. एक दिवस 'हार्ट सर्जन' त्याची गाडी दुरुस्त करायला त्याच्याकडे आला. बोलता बोलता गॅरेज मालकाला कळलं की, त्याचा हा कस्टमर एक हार्ट सर्जन आहे. तो सर्जनला म्हणाला की, आपल्या दोघांचं काम एकसारखंच आहे. यावर सर्जनने आश्चर्य होऊन विचारलं,'ते कसं काय?'

राजाचा आदर्श

कुठल्यातरी एका क्षुलक कारणावरून नाराज झालेल्या राजाने आपल्या पत्नीला घरातून हाकलून लावले. त्यांचे हे अहंकारी वागणे पाहून राजपुरोहितांना खूप वाईट वाटले. त्यांनी राज्याची साथसोबत  सोडली. हळूहळू ही वार्ता नगरभर पसरली. लोक राजाविषयी काहीबाही बोलू लागले.ते म्हणू लागले की, जो राजा साध्या सरळ स्वभावाच्या आपल्याच माणसांचे रक्षण करू शकत नाही, तो प्रजेचे काय रक्षण करणार? लोक राजाज्ञाचे उल्लंघन करू लागले.या परिस्थितीचा फायदा घेऊन शेजारच्या राजाने राज्यावर आक्रमण केले.

आचरणात लपला स्वभाव

एका राजाला तीन पुत्र होते. त्यांच्या भविष्याबाबत तो चिंतीत होता. एक दिवस राजा आपल्या तिन्ही राजपुत्रांना सोबत घेऊन नगर भ्रमणासाठी निघाला. वाटेत एक महात्मा भेटला. राजाने त्यांना वंदन केले आणि आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचारले. महात्माने तिघांना प्रत्येकी दोन दोन केळी खायला दिली. एकाने केळी खाऊन साली रस्त्यावरच टाकून दिल्या. दुसऱ्याने केळी खाऊन त्याच्या साली कचरा कुंडीत टाकल्या. तिसऱ्या राजपुत्राने केळी खाऊन साली एका गायीला खायला दिल्या.

धावण्यातून शिकवण

एक दहा वर्षांचा मुलगा रोज आपल्या वडिलांसोबत डोंगरावर फिरायला जात असे. एक दिवस फिरताना मुलगा म्हणाला,"बाबा, आज आपण धावू या आणि जो पहिल्यांदा शिखरावर पोहोचेल, तो जिंकेल."
वडिलांनी गोष्ट मान्य केली आणि शर्यत सुरू झाली. काही अंतर गेल्यावर वडील धावायचे थांबले. यावर मुलाने विचारले,"आपण का थांबलात? तुम्ही हार मानली का?"
वडील म्हणाले,"चप्पलमध्ये खडा आलाय, म्हणून थांबलोय."
मुलगा म्हणाला," बाबा, माझ्याही चप्पलमध्ये खडे घुसलेत,

यशाचा धडा

एका तरुणाने खूप उत्साहात एका बिझनेसची सुरुवात केली होती. पण पाच-सहा महिन्यांतच एका मोठ्या तोट्यामुळे त्याला त्याचा बिझिनेस बंद करावा लागला. यानंतर तो उदास राहू लागला. बराच काळ उलटला तरी त्याने नवीन कुठलं काही काम सुरू केलं नव्हतं. ही गोष्ट त्या तरुणाच्या शिक्षकाला समजली. शिक्षकाने तरुणाला आपल्या घरी बोलावले. ते तरुणाला म्हणाले,'आयुष्यात हे सगळं होतंच राहतं, याच्याने निराश होऊन जायची काय गरज आहे?'

शिकण्याचं वय

स्वामी रामतीर्थ  जपानच्या प्रवासावर होते. ज्या जहाजातून ते निघाले होते, त्यात नव्वद वर्षांचा एक वृद्ध पुस्तक उघडून चिनी भाषा शिकत होता. तो सारखं सारखं वाचत आणि लिहीत होता. स्वामीजींनी विचार केला की, हा वृद्ध या वयात चिनी भाषा शिकून काय करणार आहे? एक दिवस त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला विचारलंच,"माफ करा, पण तुमचं तर खूपच वय झालं आहे आणि शरीरानं जर्जरही झाला आहात. आणि या वयात ही कठीण भाषा कधीपर्यंत शिकणार आहात? आणि शिकलात तरी याचा वापर कधी आणि कसा करणार?"