Tuesday, September 26, 2023
बोधकथा- सुख
एकदा लाओ त्झु तुंगच्या अनुयायांमध्ये सुख आणि दु:ख यांच्या व्याख्येबाबत दीर्घ वाद सुरू झाला. लाओ त्झू त्यांना शहराकडे घेऊन गेला. वाटेत एक मुलगा बासरी वाजवत रस्त्यावर काही भटक्या प्राण्यांना नाचवत होता. अत्यंत गरिबीसुद्धा त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा गुलाबीपणा पुसून टाकू शकली नाही. ते काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक सोने, चांदी आणि तांबे विकणारा व्यापारी खूप अस्वस्थ आणि दुःखी दिसला. बोलता बोलता तो लाओ त्झु तुंगला म्हणाला, 'खरंच! मी हिरे व्यापारी झालो असतो तर.'' लाओ त्झू पुढे गेला आणि आपल्या अनुयायांना म्हणाला, ''बघितलंत, आता हे सिद्ध झाले आहे की आनंद म्हणजे जे आहे त्याचा आनंद घेणे आणि दु:ख म्हणजे जे नाही ते, मला फक्त तेच हवे आहे म्हणणे.
Monday, September 18, 2023
(बोधकथा) ... आणि गुराख्याने सिंहाची गोष्ट ऐकली नाही
कुठल्यातरी एका गावात एक गुराखी राहत होता. तो गावातल्या गाई-म्हशी जवळच्या जंगलात चरायला न्यायचा.एक दिवस त्याने जंगलात गुरांना हिरवे लुसलुशीत गवत चरायला सोडले होते. तिथे त्याने पाहिले की, सिंह आणि सरड्यामध्ये भांडण लागलं आहे. सिंह आपल्या पंज्याने सरड्याला पकडायचा प्रयत्न करायचा,पण तेवढ्यात सरडा त्याच्या नाकात घुसून त्याचा चावा घ्यायचा. सिंह वेदनेने ओरडायचा आणि शिंकून सरड्याला बाहेर काढायचा. सिंह त्याला वारंवार पकडण्याचा प्रयत्न करायचा, पण सरडा काही त्याच्या तावडीत सापडत नव्हता. हे सगळं गुराखी पाहत आहे, हे सिंहाने पाहिले. सिंहाला स्वतःचीच लाज वाटली. तो विचार करू लागला, जर या गुराख्याने गावातल्या सगळ्यांना सांगितलं तर माझी काय इज्जत राहील? त्यापेक्षा याला समजावून सांगू.
'ये गुराख्या! घाबरू नको. माझ्याकडे ये, मी तुला काहीही करणार नाही.'' सिंह संकोचून म्हणाला.
गुराखी घाबरत घाबरत म्हणाला, ' काय म्हणता वनराज ?' 'सिंहाला सरड्याकडून पराभव पत्करावा लागला, हे कोणाला सांगू नकोस. माझी सगळी इज्जत मातीमोल होईल.' सिंह पुढे इशारा देत म्हणाला, ' जर कुणाला कळल तर त्यादिवशी तुझी काही खैर नाही. कळलं का?' गुराखी सिंहापुढं काय बोलणार! त्याची बोबडीच वळली. त्याने शपथ घेतली की, ही घटना कोणाला सांगणार नाही.
रात्री जेवण करून गुराखी बाहेर खाटेवर आडवा झाला. अचानक त्याला दिवसाची घटना आठवली. तो हसला.बायकोने विचारले, 'काय झालं?' गुराख्याला मग आणखी हसू येऊ लागलं.
त्याच्या बायकोला तर काहीच कळेना. ' काय झालं मला सांगाल की नाही? का तुम्हाला जंगलातल्या भूतानं पछाडलंय?'
कसं तरी हसू आवरत गुराखी म्हणाला, 'दुपारी एक गोष्ट घडली, ती आठवली, बाकी काही नाही.'
“मला पण सांगा,” बायको म्हणाली, “मी तुला सांगू शकत नाही आणि सांगितलं तर तू विधवा होशील. सिंह मला मारून टाकेल.
सिंह तुम्हाला मारायला काय तो थोडंच इथं आहे? त्याला कसं कळणार? ते काही नाही मला तुमच्या हसण्याचं कारण कळलंच पाहिजे.'
गुराख्याचं त्याच्या बायकोपुढं काही चाललं नाही. तो शेवटी समजावत म्हणाला, 'गावात कोणाला सांगू नकोस. सिंहाला कळलं तर समज माझा मृत्यू निश्चित आहे. त्याने दुपारी जंगलात घडलेला सगळा प्रकार बायकोला सांगितला. मग काय!सकाळ होताच त्याच्या बायकोने तो शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितला. बघता बघता तो सिंहापर्यंत पोहचला. दुसऱ्या दिवसापासून गुराख्यानं जनावरं घेऊन जाणं बंद केलं. सिंह त्याला ठार मारेल, याची पक्की भीती त्याला बसली.
तात्पर्य- तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Tuesday, September 12, 2023
(बोधकथा) संकटांना धैर्याने सामोरे जा
नॉर्वे येथे जन्मलेले ओले बर्नेमन बुल हे जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक होते. अनेक जगप्रसिद्ध कंपन्या त्यांना आपल्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यास उत्सुक होत्या. एके दिवशी पॅरिसमधील एका कंपनीने एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली. ती कंपनी काही काळापासून तोट्यात चालली होती. इव्हेंटचा उद्देश पैसा गोळा करणे हा होता, परंतु कार्यक्रम अयशस्वी झाल्यास कंपनी बुडेल, अशी भीती आयोजकांना होती. ती कंपनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्ग शोधू लागली. प्रत्येकजण आपापली मते मांडू लागला. कोणीतरी प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींना नृत्यासाठी आमंत्रित करण्याचा सल्ला दिला. काहींनी जादूगाराला बोलवा असे म्हटले तर काहींनी दुसरे काही सांगितले. अचानक एक तरुण आयोजक म्हणाला, 'बुल यांना व्हायोलिन वाजवायला बोलावलं तर कार्यक्रम यशस्वी होईल यात शंका नाही.' बुल यांनी निमंत्रण स्वीकारले. कंपनीच्या तोट्याविषयी त्यांना कल्पना होती. आपल्यामुळे जर एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला फायदा होत असेल तर आपण त्यांना नक्कीच साथ द्यावी, असा विचार त्यांनी केला.कार्यक्रमाच्या दिवशी सभागृह खचाखच भरले होते. बुल यांचे दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते. बुल यांनी व्हायोलिनवर धून वाजवायला सुरुवात केली. पण ती धून नुकतीच सुरू झाली नव्हती तोच अचानक व्हायोलिनची तार तुटली.कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तीन तारांवर आपली नवीन धून रचली आणि ती मनापासून वाजवली. कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षक आपापल्या जागी उभे राहून त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवत असल्याचे त्यांनी पाहिले.यामुळे कंपनीची प्रतिष्ठा तर सुधारलीच पण बुल यांना एक उत्तम धूनही मिळाली.
बोध: आपत्कालीन परिस्थितीत धीर धरा.
Wednesday, September 6, 2023
(बोधकथा) स्वच्छ विचार
एका ऋषींच्या झोपडीत त्यांचे सात शिष्य राहत होते. ते सर्वजण त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करत. त्यांच्यामध्ये एक असा शिष्य होता, जो प्रत्येक काम वेळेवर करत असे आणि इतर शिष्यांपेक्षा अधिक स्वच्छ व छान राहत असे.त्याच्या या सवयीमुळे त्याचे गुरू खूप खुश होते. पण त्या शिष्याच्या मनात इतर शिष्यांबद्दल खूप मत्सराची भावना होती. इतर कोणत्याही शिष्याने आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये, असे त्याला वाटत असे.गुरूंना याची कल्पना होती, पण ते त्याला समजावण्याचा मार्ग शोधत होते.एके दिवशी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितले की आजपासून ते त्यांच्यासाठी अन्न शिजवतील आणि त्यांची भांडीसुद्धा स्वच्छ करतील.सर्व शिष्य एकाच आवाजात बोलले, 'पण गुरुजी असे का?' यावर गुरू काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपले काम सुरू केले. दररोज जेव्हा ते भांडी साफ करायचे तेव्हा तो बाहेरून चांगली साफ करायचे पण आतून नीट साफ करत नसत. शेवटी एके दिवशी तो शिष्य गुरुजींना म्हणाला, 'गुरुजी तुम्ही भांडी बाहेरून नव्हे तर आतून नीट स्वच्छ करायला हवे. नाही तर आपण सगळे आजारी पडू.'
गुरुजी म्हणाले, 'बेटा, तुला समजले आहेच की वरून शरीर स्वच्छ ठेवल्याने काहीही होणार नाही. आपण मानसिक आजारी पडू नये म्हणून आपल्या विचारांमध्येही अशीच स्वच्छता ठेवली पाहिजे. हे ऐकून शिष्याला सर्व काही समजले आणि त्या दिवसापासून त्याने द्वेषाची भावना सोडून स्वच्छ विचारांचा अंगीकार केला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली



