Sunday, May 24, 2020

पानाची ताकद

एका बागेत गुलाबाचे एक रोप होते. बागेत आलेला प्रत्येकजण गुलाबाच्या फुलांची प्रशंसा करत असे. अशात रोपामधल्या एका पानामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की, आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं तो उदास राहू लागला. एक दिवस खूप मोठं वादळ आलं आणि गुलाबाची सगळी फुलं तुटून पडली. ते उदास पानदेखील तुटून उडत उडत एका तलावात जाऊन पडलं. त्या तलावात एक मुंगी बुडत होती आणि जीव वाचवण्यासाठी धडपडत होती.
तिला पाहून पान म्हणाले की, माझ्या अंगावर चढ. मुंगीनं तसंच केलं. हळूहळू वादळ कमी झालं आणि पानानं त्या मुंगीला तलावाच्या काठापर्यंत पोहोचवलं. काठावर आल्यावर मुंगीने पानाला धन्यवाद दिले आणि म्हणाली,'माझा जीव वाचवून तू माझ्यावर  खूप मोठे उपकार केले आहेस. तू खराच महान आहेस. तुझी मी खूप खूप आभारी आहे.' यावर पान म्हणाले की, 'धन्यवाद तर मी तुला द्यायला हवेत. आज तुझ्यामुळे मला माझी योग्यता समजली, नाहीतर मी याबाबतीत अज्ञानीच होतो. आज तुझ्या मुळे पहिल्यांदा मी माझ्या जीवनाचे ध्येय आणि माझी ताकद ओळखली.
तात्पर्य- सर्वांकडे काही ना काही योग्यता असते, फक्त तुम्हाला ती योग्यता ओळखता आली पाहिजे.

No comments:

Post a Comment