Sunday, May 24, 2020

गरुड भरारी

एकदा एका राजाला गरुडाची दोन पिलं भेट स्वरूपात मिळाली. राजाने त्यांचा सांभाळ करण्यासाठी एका गड्याची नियुक्ती केली. काही दिवसांनी राजा ती दोन पिलं पाहायला गेला. ती दोन्ही पिलं आता मोठी झाली होती. त्यांचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केलेल्या माणसाला राजानं सांगितलं, की त्याला गरुडांना उडताना मला पाहायचं आहे. माणसाने गरुडांना आकाशाच्या  दिशेनं उडवलं.
राजानं पाहिलं की, एक गरुड आकाशात उंच झेपावलं आहे आणि मस्त घिरट्या घालतं आहे. दुसरे गरुड मात्र फार उंचावर उडालं नाही. शिवाय ते लगेच खाली येऊन झाडाच्या फांदीवर बसलं.  राजाने त्या माणसाला याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, हा गरुड सुरुवातीपासूनच असा करत आहे. तो फांदी सोडतच नाही.
राजाने राज्यभर घोषणा केली की, जो या गरुडाला उडणे शिकवेल, त्याला चांगलं बक्षीस दिलं जाईल. बरेच लोक आले,पण त्या गरुडाच्या वागण्यात काही फरक पडला नाही. एक दिवस राजाने पाहिले की, दुसरा गरुडदेखील आता पहिल्या गरुडाबरोबर आकाशात उंचावर उडत आहे. राजाने त्या माणसाला शोधून आणण्यास सांगितले, ज्याने गरुडाला उडायला शिकवलं आहे. तो एक शेतकरी होता. ज्यावेळेला राजाने त्याला विचारलं की, त्याने हे सगळं कसं साध्य केलं. शेतकरी म्हणाला की, त्याने फक्त एवढंच केलं की, गरुड ज्या फांदीवर बसत होता, ती फांदीच कापून टाकली.
तात्पर्य: वाईट सवयीची फांदी कापून टाका आणि आपली क्षमता ओळखा.

No comments:

Post a Comment