Saturday, May 23, 2020

राजाचे मित्र

राजा आदर्शसेनच्या राज्यात प्रजा खूप आनंदी आणि समाधानी होती. तिथे कधी कसला ताणतणाव नव्हता. ही गोष्ट शेजारच्या राज्याचा राजा कुशलसेनपर्यंत पोहचली. त्याच्या राज्यात नेहमीच भांडणतंटे होत होते आणि प्रजा दुखी होती. राजा कुशलसेन आपल्या शेजारी राज्यातील सुख-शांती आणि आनंद याचे रहस्य जाणून घेण्यासाठी आदर्शसेनकडे पोहचला आणि म्हणाला," माझ्या राज्यात तर सगळीकडे दुःख आणि आजार पसरला आहे. संपूर्ण राज्यात बेबंदशाही माजली आहे. कृपया, मला तुमच्या राज्यातील सुख-शांतीचे रहस्य सांगा. "

कुशलसेनचे बोलणे ऐकून आदर्शसेन हसला आणि म्हणाला," माझ्या राज्यात जी शांतता नांदते आहे, त्याला माझे चार मित्र कारणीभूत आहेत."
यावर कुशलसेनची उत्सुकता वाढली. तो म्हणाला," कोण आहेत ते चार मित्र?  आणि ते मलाही मदत करणार नाहीत काय?"
आदर्शसेन म्हणाला," नक्कीच करतील. ऐका! माझा पहिला मित्र आहे-सत्य. हा मला कधी असत्य बोलू देत नाही. दुसरा मित्र आहे-प्रेम. हा मला कधी कुणाची घृणा करण्याची संधी देत नाही. तिसरा मित्र न्याय आहे. हा कधी कुणावर अन्याय होऊ देत नाही. हा माझे कान, डोळे सताड उघडे ठेवतो. चौथा मित्र आहे-त्याग. त्यागाची भावना मला इर्षेपासून दूर ठेवते.हे चौघे मिळून मला नेहमी साथ सोबत करीत असतात आणि माझ्या राज्याचे रक्षण करतात." कुशलसेनला आदर्शसेन राजाच्या यशाचे रहस्य समजले.
तात्पर्य- माणसाने आपल्या जीवनात सद्गुण अंगिकारले पाहिजेत.

No comments:

Post a Comment