एकदा सुकरात आपल्या शिष्यांसोबत कोणत्या तरी विषयावर बोलत बसले होते. तेवढ्यात तिथे एक ज्योतिष आला आणि म्हणाला,"मी ज्ञानी आहे. मी कुणाचाही चेहरा पाहून त्याचे चरित्र काय आहे, हे सांगू शकतो. सांगा,तुमच्यापैकी कोण माझी ही विद्या पारखू इच्छितो."
सुकरातनी त्याला आपल्याविषयी सांगायला सांगितले. ज्योतिषाने काही वेळ त्यांना निरखून पाहिलं आणि म्हणाला,"तुमच्या चेहऱ्याची ठेवण सांगते की, तू सत्तेविरुद्ध आहेस.तुझ्या अंगी द्रोह करण्याची भावना प्रबळ आहे. तुझ्या डोळ्यांभोवती ज्या सुरकुत्या आहेत. त्या तू अत्यंत रागीट असल्याचे प्रमाण देतात."
हे सर्व ऐकून शिष्यगण संतापले. पण सुकरातनी त्यांना गप्प बसवले. ज्योतिष पुढे म्हणाला,"तुझे बेढब डोके आणि कपाळावरून तू खूप लोभी आहेस, हे कळते."
सुकरातनी त्याला बक्षीस दिलं आणि निरोप दिला. शिष्य मंडळी आश्चर्यात पडले. गुरूंचे वागणे त्यांच्या पचनी पडेना.
सुकरात त्यांना समजावत म्हणाले,"ज्योतिषाने सांगितलेले सगळे अवगुण माझ्यात आहेत. पण त्याला माझ्यातल्या विवेक ओळखता आला नाही. या विवेकामुळेच मी माझ्यातल्या अवगुणांवर विजय मिळवला आहे. तो इथेच चुकला, माझ्या बुद्धीची ताकद त्याला ओळखता आली नाही."
तात्पर्य:बुद्धीचा वापर करून आपण आपल्या अवगुणांवर विजय मिळवू शकतो.

No comments:
Post a Comment