Saturday, June 24, 2023

आशावादी

एका गावात एक अनाथ मुलगा राहत होता. तो एकटाच एका झोपडीत राहत असे. देवळाची स्वच्छता करून , देवांचे दिवे, समया घासून पुसून लख्ख करत असे. देवळाचे पुजारी त्याच्यावर खुश होते. ते त्याला एक वेळ पोटभर जेवण देत असत. दुपारी तो शाळेत जायचा. गुरुजी छान शिकवायचे. त्याला शाळा खूप आवडायची. संध्याकाळी तो शाळेची साफसफाई करायचा. अभ्यास करायचा. गुरुजी त्याला संध्याकाळी जेवण द्यायचे. तो गुरुजींच्या घरातलेही काम करायचा. शांत, समाधानी होता तो. म्हणून सगळ्यांना आवडायचा.

देवळातल्या पुजारी काकांनी देवळातली पाच वातींची समई त्याला दिली होती. तो रोज रात्री ती समई लावायचा.पाचही वाती लावायचा. गावातला वाणी त्याला एका बाटलीत तेल द्यायचा, समईच्या वाती लावण्यासाठी.

एकदा काय झालं, त्याने समईच्या पाचही वाती लावल्या आणि तो बाहेर अंगणात चांदणं बघत उभा राहिला. थोड्या वेळाने आत आला. त्याला समईच्या वाती बोलत आहेत, असं वाटलं. तो हळूच आत आला. पहिली वात म्हणाली , ’’माझं नाव शांती आहे. मला शांतता हवी असते. आता जगात कुठेही शांतता उरली नाही, म्हणून मी आता विश्रांती घेते. विझून जाते. असं म्हणून ती विझून गेली. दुसरी वात म्हणाली , माझं नाव आहे.. विश्वास. आजकाल कोणीही कोणावर विश्वास ठेवत नाही. सगळीकडे संशयाचं वातावरण आहे. मला हे सहन होत नाही. म्हणून मी इथून जाते.विझून जाते. असं म्हणून ती विझून गेली. तिसरी वात म्हणाली , मी आहे प्रामाणिकपणा. आता कोणीच प्रामाणिक राहिलं नाही. मी कशी राहणार या जगात ? मी चालले. असं म्हणून ती विझून गेली. चौथी वात म्हणाली, माझं नाव आहे, श्रम, कष्ट. हल्ली सगळेच ऐतोबा झालेत. फुकटखाऊ बनलेत. कोणालाच श्रम करायला नकोत. मी नाही इथे राहणार. मी जाते असं म्हणून चौथी वात पण विझून गेली.

झोपडीत अंधार पसरल्यासारखं वाटू लागलं. मुलगा घाबरला. तो त्या पाचव्या वातीला म्हणाला, तू राहशील ना माझ्या सोबत ? तू नको विझून जाऊ. तू गेलीस तर पूर्ण अंधार पडेल. मला भीती वाटते आहे.

पाचवी वात त्याला म्हणाली, बाळा, मी आहे आशा. मी आहे तुझ्यासोबत. आणि घाबरू नकोस. मी आहे ना ? आशा आहे ना ? आशेच्या मदतीने आपण उरलेल्या चारही वाती लावू शकतो. शांती, विश्वास, प्रामाणिकपणा, कष्ट हे सारं मिळवू शकतो.पुन्हा आनंदात उजळून जाऊ शकतो.बरोबर ना ?

मुलगा म्हणाला , हो. बरोबर. आशा कधीच सोडायची नाही. आशा ठेवली की सारं काही मिळू शकतं.

आणि आशेने विझलेल्या चारही वाती पुन्हा प्रज्वलित केल्या. शांत प्रकाशाने झोपडी उजळली. वातावरण प्रसन्न झालं.

तात्पर्य : नेहमी आशावादी असावं.

No comments:

Post a Comment