Thursday, May 21, 2020

कोण आहे श्रेष्ठ?

एका संताकडे दोन विद्वान आले आणि स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगू लागले. त्यांनी संताला विनंती केली की, दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे,हे तुम्हीच सांगावे. संताने दोघांची परीक्षा घेतली,पण दोघे 'एकापेक्षा एक' निघाले. त्यांनाही कळेना,कुणाला श्रेष्ठ सांगावे. काहीतरी विचार करून संत म्हणाले, "आतापर्यंत दोघेही समान समान विद्वान आहात, असेच दिसते. परंतु तुम्हां दोघांपैकी कुणा एकाला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवता आले पाहिजे. त्यासाठी तुमची आणखी एक परीक्षा घेतली जाईल. यात जो उत्तीर्ण होईल, तो श्रेष्ठ असेल.'

संताने त्यांच्यासमोर फळं, फुलं आणि काही वस्तू ठेवल्या. आणि काही विषयांवर चर्चा सुरू केली. एका प्रश्नावर दोघेही अडखळले. शिवाय संतांनी दिलेल्या उत्तराला चुकीचे असल्याचे सिद्ध करू लागले. यावर संत आवेशात येऊन दोघांना वाईट-वंगाळ बोलू लागले. त्यांना रागावलेले पाहून पहिला विद्वान शांत राहून आपली बाजू मांडू लागला. पण दुसरा विद्वान मात्र त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यांना एकेरी संबोधू लागला. त्याने रागातच समोर असलेल्या वस्तू, फळं-फुलं फेकून दिल्या. इतकेच नव्हे तर तो उठला आणि संतांच्या अंगावर धावून जाऊ लागला.
संत म्हणाले,"तुझी परीक्षा संपली." पहिल्या विद्वानाकडे पाहून ते म्हणाले,"तूच श्रेष्ठ आहेस. जी व्यक्ती आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाही,ती आपल्या ज्ञानाचा कधी सदुपयोग करू शकत नाही. क्रोधावर नियंत्रण ठेवणारी व्यक्तीच श्रेष्ठ समजली जाते.' दुसरा विद्वान शरमला.
तात्पर्य -क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment