एका ऋषींच्या झोपडीत त्यांचे सात शिष्य राहत होते. ते सर्वजण त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करत. त्यांच्यामध्ये एक असा शिष्य होता, जो प्रत्येक काम वेळेवर करत असे आणि इतर शिष्यांपेक्षा अधिक स्वच्छ व छान राहत असे.त्याच्या या सवयीमुळे त्याचे गुरू खूप खुश होते. पण त्या शिष्याच्या मनात इतर शिष्यांबद्दल खूप मत्सराची भावना होती. इतर कोणत्याही शिष्याने आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये, असे त्याला वाटत असे.गुरूंना याची कल्पना होती, पण ते त्याला समजावण्याचा मार्ग शोधत होते.एके दिवशी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितले की आजपासून ते त्यांच्यासाठी अन्न शिजवतील आणि त्यांची भांडीसुद्धा स्वच्छ करतील.सर्व शिष्य एकाच आवाजात बोलले, 'पण गुरुजी असे का?' यावर गुरू काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपले काम सुरू केले. दररोज जेव्हा ते भांडी साफ करायचे तेव्हा तो बाहेरून चांगली साफ करायचे पण आतून नीट साफ करत नसत. शेवटी एके दिवशी तो शिष्य गुरुजींना म्हणाला, 'गुरुजी तुम्ही भांडी बाहेरून नव्हे तर आतून नीट स्वच्छ करायला हवे. नाही तर आपण सगळे आजारी पडू.'
गुरुजी म्हणाले, 'बेटा, तुला समजले आहेच की वरून शरीर स्वच्छ ठेवल्याने काहीही होणार नाही. आपण मानसिक आजारी पडू नये म्हणून आपल्या विचारांमध्येही अशीच स्वच्छता ठेवली पाहिजे. हे ऐकून शिष्याला सर्व काही समजले आणि त्या दिवसापासून त्याने द्वेषाची भावना सोडून स्वच्छ विचारांचा अंगीकार केला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment