Tuesday, June 9, 2020

नवं घर घेण्याची आस

एका गावात एक माणूस राहत होता. त्याचं घर खूप सुंदर होतं आणि चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं होतं. आजूबाजूला मस्त हिरवळ होती. जवळूनच खळखळ नदी वाहत होती. त्याच्या घराजवळ खूप शांतता होती. या परिसरात पशु-पक्ष्यांचा मोठा वावर होता. हा माणूस अनेक वर्षांपासून या घरात राहत होता. पण अलीकडे त्याला इथे काही चांगलं वाटत नव्हतं. त्याला आपल्या घरात राहायला आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने हे घर विकून दुसरं नवीन घर घेण्याचा विचार केला. त्याचा एक मित्र वर्तमानपत्रात कामाला होता. त्याला एकदा भेटून आपली इच्छा प्रकट केली. नवीन घरं असली तर सांगण्यास सांगितले.
काही दिवस निघून गेले. एक दिवस त्याच्या मित्राने पाच-सात घरे बघायला सांगितली. ती त्याने पाहिलीही, पण त्याला त्यातले एकही घर पसंद पडले नाही.

एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना त्याला एक जाहिरात दिसली. त्यात लिहिलं होतं,' शहराच्या भाऊगर्दीपासून दूर आपल्या स्वप्नाच्या घरात राहा. चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या, हिरवाईने आच्छादलेल्या आणि खळखळ वाहणाऱ्या नदीच्या आणि पशु-पक्ष्यांच्या सानिध्यात शांत,आरामशीर जीवन जगा.'
माणसाने ठरवले की,ते घर घ्यायचे. त्याने लगेच आपल्या मित्राला फोन केला . पण मित्राने सांगितले की, ही जाहिरात तुझ्याच घराची आहे. यावर त्या माणसाला जाणीव झाली की, विनाकारण आपण नव्या घराच्या मागे लागलो होतो.वास्तविक आपण अगोदरच आपल्या स्वप्नाच्या घरात राहत होतो.
तात्पर्य:जे काही आपल्याजवळ आहे, त्याची कदर करायला शिका.

No comments:

Post a Comment