Saturday, December 16, 2023

(बोधकथा) मदतीसाठी विचित्र युक्ती


प्रसिद्ध उद्योगपती जॉन्सन एकदा एका गावातून आपल्या गाडीतून निघाले होते. त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार त्या गावाच्या बाहेर पडून मोकळ्या रस्त्यावर आली तेव्हा अचानक मोठा आवाज झाला. त्यांच्या  गाडीवर कोणीतरी दगड फेकला होता. त्याच्याने गाडीची काच फुटली होती. जॉन्सन यांनी लगेच ब्रेक लावला आणि गाडीतून खाली उतरून दगड जिकडून आला होता, त्या दिशेने पाहू लागले. ते चांगलेच संतापले होते.  तेवढ्यात त्यांची नजर एका मुलावर पडली, जो तिथेच काही अंतरावर  घाबरून उभा होता.  ते त्याला थप्पड मारायला पुढे सरसावले, तेवढ्यात तो मुलगा हात जोडून म्हणाला, 'दगड मारल्याबद्दल माफ करा साहेब मला. पण माझा नाईलाज होता.  येथून जाणारी सर्व वाहने इतक्या वेगाने धावत आहेत की माझ्या ओरडण्याचा आवाज कोणाच्या कानावर पडत नाही.  मागच्या रस्त्याच्या कोपऱ्यावर माझा मोठा भाऊ त्याच्या व्हीलचेअरवरून खाली जमिनीवर पडला आहे.  मी एकटा त्याला उचलून व्हीलचेअरवर बसवू शकत नाही. म्हणून मी बराच वेळ मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत आहे.  पण कुणीच थांबलं नाही.  तेव्हा मला नाईलाजाने तुमच्या गाडीवर दगडफेक करावी लागली.  "तुम्हीच सांगा, मी काय करू?  मी माझ्या भावाला त्याच्या नशिबावर सोडू का?'' मुलाचे निरागस शब्द ऐकताच जॉन्सन यांचा राग शांत झाला.  त्यांना अपराधीसारखे वाटले. ते त्याच्यासोबत मुलाच्या भावाकडे गेले. आधार देऊन त्याला त्याच्या व्हीलचेअरवर बसवले.  दोन्ही भावांनी जॉन्सनचे आभार मानले.  जॉन्सन हा प्रसंग विसरू शकले नाहीत.  बर्‍याच दिवसांनी त्यांनी त्यांचे चरित्र लिहिले तेव्हा त्यात त्यांनी एक खास वाक्य लिहिले जे खूप प्रसिद्ध झाले.  ते वाक्य होतं, 'आयुष्यात एवढ्या वेगाने धावू नका की तुम्हाला थांबवण्यासाठी एखाद्याला दगडाचा वापर करावा लागेल.' त्या घटनेचा त्यांच्यावर इतका खोलवर परिणाम झाला होता की, हे वाक्य त्यांच्या आयुष्याचे एक महत्त्वाचे सूत्र ठरले. हे वाक्य पुढे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

बोध- आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment