Monday, July 24, 2023
(बालकथा) संगतीचा परिणाम
एकदा राजा शिकार करण्याच्या उद्देशाने आपल्या लवाजम्यासह जंगलातून निघाला होता. तो पुढे घनदाट जंगलात शिरला. तो काही अंतर चालून गेल्यावर , त्याला एका बाजूला डाकू लपण्याची जागा दिसली. तितक्यात तिथल्याच जवळच्या झाडावर बसलेला पोपट मोठ्याने ओरडला, 'पकडा, पकडा, राजा आला आहे. त्याच्याकडे भरपूर सामान आहे. लुटा, लुटा, लवकर या, लवकर या.' पोपटाचा आवाज ऐकून सर्व डाकू राजाच्या दिशेने धावले. डाकू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून राजा आणि त्याच्या सैनिकांनी धूम ठोकली. धावत धावत ते बरेच दूरवर निघून आले. समोर एक मोठं झाड दिसलं. बाजुला एक झोपडी होती. थोडा वेळ आराम करायला ते झाडाजवळ गेले. तो झाडाजवळ पोहोचताच त्या झाडावर बसलेला पोपट अदबीने म्हणाला, 'या राजन! आमच्या साधू महात्मांच्या कुटीमध्ये आपले स्वागत आहे.आत या, पाणी प्या आणि आराम करा.'पोपटाचे बोलणे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की एकाच जातीतील दोन प्राण्यांचे वागणे इतके वेगळे कसे असू शकते? राजाला काहीच कळेना. त्याने पोपटाची आज्ञा पाळली आणि आत संन्यासीच्या झोपडीत शिरला. साधूला नमस्कार केल्यावर तो त्याच्या जवळ बसला आणि त्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. मग हळूच विचारले, 'ऋषिवर, या दोन पोपटांच्या वागण्यात एवढा फरक कसा?' साधूने धीराने सर्व काही ऐकले आणि म्हणाला, 'राजन, हा सहवासाचा परिणाम आहे. दरोडेखोरांसोबत राहून पोपटही दरोडेखोरांसारखा वागू लागला आहे. आणि त्यांची भाषा बोलू लागला आहे.म्हणजेच जो ज्या वातावरणात राहतो, तो तसाच बनतो.' म्हणण्याचा तात्पर्य असा आहे की, विद्वानांच्या संगतीत राहून मूर्खही विद्वान होतो आणि जर विद्वानही मूर्खांच्या संगतीत राहिला तर त्याच्यातही मूर्खपणा येतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment